
राष्ट्रवादीच्या बॅनरहून अर्चनाताई पाटलांचा फोटो गायब
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांना विसर
धाराशिव दि.४ (प्रतिनिधी) -राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि पक्षात मानाचे स्थान असलेले संजय बनसोडे आणि मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात मुख्य ठिकाणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी शुभेच्छा फलक लावले आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीत पक्षाकडून निवडणूक लढविलेल्या उमेदवार अर्चना पाटील यांना शुभेच्छा फलकावर स्थान न दिल्याने पक्षांतर्गत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
आगामी विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागात गल्लीबोळातील कार्यकर्त्यांमध्ये भलेमोठे डिजिटल फलकाची जणू स्पर्धा सुरू आहे. धाराशिव नगरपालिकेने डिजिटल फलक लावण्यासाठी केलेल्या बारकोडच्या नियमावलीला डावलून अनेक ठिकाणी वेगवेगळ्या इव्हेंटचे डिजिटल फलक लावले जात आहेत.
बुधवारी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे आणि शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नेमके जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भलेमोठे डिजिटल फलक लावले. मात्र त्यांना या फलकावर अर्चना पाटील यांचे छायाचित्र घेण्याचा विसर का पडला असावा ? असा प्रश्न अर्चनाताई पाटील यांच्या समर्थक महिला कार्यकत्यार्ंंना पडला होता. या फलकाची सुलटसुलट चर्चा झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी त्याबाबत खंतही व्यक्त केली.
चौकट
अर्चना पाटलांची भूमिका संदिग्ध
लोकसभा निवडणुकीत अर्चना पाटील यांनी पक्षप्रवेश केला, हे सत्य आहे. परंतु त्या पक्षाच्या कार्यालयात किंवा बैठकांना एकदाही आल्या नाहीत. त्या पक्षात सक्रिय नाहीत. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांची सध्याची भूमिका आम्हाला समजत नाही. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. त्यातूनच असा प्रकार घडला आहे. हा प्रकार जाणीवपूर्वक केलेला नाही. तरीही आम्ही अर्चनाताईंशी चर्चा करून त्यांची व महिला कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी दिली.