गुणवत्तेला कौशल्याची जोड हवी – सुशील कुलकर्णीब्राह्मण कल्याण ट्रस्टच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

गुणवत्तेला कौशल्याची जोड हवी – सुशील कुलकर्णी
ब्राह्मण कल्याण ट्रस्टच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Spread the love


धाराशिव, दि. १० (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांनी आपली बलस्थान ओळखून आपल्यातल्या सुप्त गुणांना वाव द्यावा आणि व्यवसायाभिमुख कौशल्य युक्त शिक्षणाची गुणवत्तेला जोड देऊन आयुष्यात यशस्वी व्हावे असे प्रतिपादन पत्रकार सुशील कुलकर्णी यांनी केले.
ते ब्राह्मण कल्याण ट्रस्टच्या वतीने रविवार, ९ जून रोजी धाराशिव येथील परिमल मंगल कार्यालयात आयोजित गुणगौरव सोहळ्यात अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी व्यासपीठावर इंदौर येथील उद्योजक धनंजय क्षीरसागर, बीड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर तसेच ब्राह्मण कल्याण ट्रस्टचे गजानन घुगीकर आदी उपस्थित होते. ब्राह्मण कल्याण ट्रस्टच्या गुणगौरव सोहळ्याचे हे तिसरे वर्ष आहे.
यावेळी पुढे बोलताना सुशील कुलकर्णी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपली बलस्थान ओळखून आपल्यातल्या सुप्त गुणांना वाव द्यावा, त्यातून चांगले उद्योजक होण्याचा प्रयत्न करावा. व्यवसायाला प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी आपले कर्तृत्व इतके उंचीवर पोहोचवावे की मान उंच करून पाहणार्‍यांची डोक्यावरची टोपी खाली पडावी. कितीही अपयश आले तरीही आपण उभे राहू शकतो हा विश्वास मनी बाळगावा, गुणवत्ता खेचून आणावी लागते, पैसा त्याच्या पाठीमागे आपोआप येतो. त्यामुळे पैशाच्या पाठीमागे लागू नका व्यवसायाभिमुख शिक्षणाची कास धरा जेणेकरून आपण प्रतिष्ठित व्यावसायिक होऊन जीवनात यशस्वी होऊ शकू.
डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर यांनी आजचे विद्यार्थी मार्क्सवान होत असताना त्यांना सामाजिक भान असणे गरजेचे आहे असे सांगितले. सावरकरांनी अनेक देशातील महापुरुषांचा आणि आपल्या देशातील महापुरुषांचा, तसेच वेद उपनिषदांचा अभ्यास केला होता, त्यामुळे आजच्या विद्यार्थी विद्यार्थिनीनी सावरकरांचे विचार आदर्श म्हणून समोर ठेवण्याची गरज आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना उद्योजक धनंजय क्षीरसागर यांनी आपण इंजिनियर नसलो तरी उद्योग उभारू शकतो हे आपल्यावरून सिद्ध झाल्याचे सांगितले. पालकांनी मुला मुलींना विश्वास द्यावा, भीती वाटू देऊ नये, ज्या क्षेत्रात आहात तिथे उच्च स्थान मिळवा, मोठी स्वप्न पहा, स्वप्न पूर्ण करण्यासाठी परिश्रम घ्या असे सांगितले.
या गुणगौरव सोहळ्याचे प्रास्ताविक ब्राह्मण कल्याण ट्रस्टचे गजानन घुगीकर यांनी केले. प्रारंभी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने आणि सरस्वती वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आभार अ‍ॅड. लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी मानले. यावेळी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण घेऊन यशस्वी ठरलेल्या विद्यार्थी – विद्यार्थिनींचा तसेच आयोध्येतील श्री. प्रभूरामचंद्राच्या मुर्तीप्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पौरोहित्य करण्याची संधी लाभलेले धनेश जोशी यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थी, पालक व शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट 
यावेळी इंदौर येथील नवास इस्पात इंजिनिअिंरग प्रायव्हेट लिमिटेड संचालक धनंजय क्षीरसागर यांच्यातर्फे ब्राह्मण कल्याण ट्रस्टच्या गुणगौरव सोहळ्यासाठी येणार्‍या काळात रोख बक्षीस देण्याची घोषणा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *