7 मे रोजी मतदान केंद्रावर मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध राहणार जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओंबासेपाणी व प्रथमोपचाराची सुविधाउन्हापासून बचावासाठी केंद्रांवर सभा मंडप लहान मुलांना खेळण्याची सुविधा

7 मे रोजी मतदान केंद्रावर मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध राहणार

जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओंबासे

पाणी व प्रथमोपचाराची सुविधा

उन्हापासून बचावासाठी केंद्रांवर सभा मंडप

लहान मुलांना खेळण्याची सुविधा

Spread the love



धाराशिव- 7 मे रोजी लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे.मतदान केंद्रावर मतदारांना विविध सोईसुविधा उपलब्ध देण्यात येत आहे.उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी स्वयंस्फूर्तीने निवडणुकीच्या या उत्सवात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सहभागी व्हावे.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी केले आहे.

जिल्ह्यात व्यापक प्रमाणात मतदार जागृतीसाठी मागील काही दिवसांपासून शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, महिला,सर्वसामान्य नागरिक,विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांनी सहकार्य केले. मतदान जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.मोठ्या संख्येने मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करणे हा उद्देश आहे.


उन्हापासून संरक्षणासाठी मंडप व्यवस्था
दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत आहे. मतदानाच्या दिवशी मतदानासाठी केंद्रावर येणाऱ्या मतदारांना उन्हात उभे रहावे लागू नये यासाठी जेथे आवश्यकता आहे तेथे मंडप उभारण्यात येत आहे.मतदान केंद्रावर एकावेळी जास्त मतदारांना रांगेत उभे रहावे लागणार नाही,अशी व्यवस्था करण्यात येत आहे.मतदान केंद्रावर जास्त गर्दी झाल्यास मतदारांना जवळच्या कक्षात बसण्यासाठी टेबल खुर्चीची व्यवस्था केली जाणार आहे. मतदार तसेच निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी मुबलक शुद्ध पिण्याचे पाण्याची,पाणी पिण्यासाठी ग्लास आणि स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे मतदान केंद्रावर उपलब्ध राहणार आहे.

व्हिल चेअर,प्रथमोपचार पेटी

कडक उन्हाळा लक्षात घेता वाढत्या तापमानामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्यास तातडीने उपचार करता यावे यासाठी केंद्रावर प्रथमोपचाराची सुविधा देखील उपलब्ध राहणार आहे.आवश्यकता पडल्यास ठराविक ठिकाणी डॉक्टर व अँम्बुलन्स देखील उपलब्ध असणार आहे.

ज्या मतदान केंद्रावर दिव्यांग मतदार मतदान करतील त्या केंद्रावर व्हिल चेअरची सुविधा उपलब्ध राहणार आहे.तसेच रॅम्पची व्यवस्था राहणार आहे.अंध मतदारांसाठी मतदान करतांना बॅंलेट युनिटवरच असलेल्या ब्रेल लिपीच्या आधारे मतदान करता येणार आहे.

मतदारांना व्होटर स्लिपचे वाटप

मतदारांना मतदान करतांना अडचण येऊ नये,त्यांना मतदान केंद्र,मतदार यादीतील अनुक्रमांक,भाग क्रमांक सहज उपलब्ध व्हावा यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत बार कोड असलेल्या मतदान पत्रिका (व्होटर स्लिप) घरोघरी वाटप करण्यात येत आहे.त्यामुळे मतदारांना बार कोड स्कॅन केल्यावर त्यांचे मतदान केंद्र कुठे आहे याची माहिती होण्यास मदत होईल.

प्रत्येक केंद्रावर मतदार सहायता कक्ष
जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी मतदान सहायता कक्ष स्थापन केला जाणार आहे.ज्या मतदारांना व्होटर स्लिप प्राप्त झाल्या नसतील,त्याना या केंद्रात त्या उपलब्ध होतील.मतदारांना आवश्यक सहाय्य केंद्रात उपलब्ध मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडून उपलब्ध होतील.

मतदान केंद्रावर पाळणाघर व हिरकणी कक्ष
मतदानासाठी बालकांना सोबत घेऊन येणाऱ्या मातांना मतदान केंद्रावर बालकांसाठी पाळणाघराची व हिरकणी कक्षाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.5 प्रकारची खेळणी बालकांसाठी उपलब्ध राहणार आहे. मतदान केंद्रावर आवश्यकतेनुसार दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहे. आवश्यकता असल्यास ट्यूबलाईटची व्यवस्था राहणार आहे.

मतदानाच्या दिवशी मतदारांची मतदान केंद्रावर गैरसोय होणार नाही,यासाठी जिल्हा प्रशासनाने सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी पूर्ण केली आहे.तरी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील कोणत्याही मतदाराने मतदानापासून वंचित राहू नये व मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *